अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होतील असे चित्र आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत देखील दिले होते. यामुळे सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, केडगावचा बालेकिल्ला पुन्हा परत मिळवुन आठ विरूध्द शुन्य करण्यासाठी संदीपदादा कोतकर विचारमंच पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचे समोर आले आहे.
माजी महापौर संदिप कोतकर यांना मानणारा मोठा मतदार केडगावमध्ये आहे. मात्र त्यांच्या व्यक्तिगत तांत्रिक कारणामुळे कोतकर गटाने मागील निवडणुकीकडे पाठ फिरवली होती. यावेळी मात्र पुर्ण ताकदीने केडगावच्या मैदानात उतरण्यासाठी कोतकर गटाने तयारी सुरू केली आहे. केडगाव मध्ये संदीप दादा कोतकर विचारमंच पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आहे.
कोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केडगाव मध्ये घरोघरी जात मतदार नोंदणीचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. कोतकर यांना मागील निवडणूक काही कारणास्तव लढवता आली नाही. यावेळी मात्र कोतकर गट पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरणार आहे. यासाठी कोतकर गटाची पूर्वतयारी सुरू देखील झाली आहे. केडगाव मधील सर्व जागा जिंकायच्या, असा चंग त्यांनी बांधला आहे.