अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवेला न्यायालयाने जिल्हाबंदीची स्पष्ट अट घातली असतानाही, तो नगर शहरात मोकाट फिरत असल्याची तक्रार रेखा जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षक, जिल्हा न्यायालय आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे केली आहे. आरोपी सागर भिंगारदिवे राजकीय नेते आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये उठबस करताना दिसत आहे. तसेच, सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करून समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप रुणाल जरे यांनी केला आहे. रेखा जरे यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेला आता सुमारे पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला असून, सद्यस्थितीत संबंधित खटला जिल्हा न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात पत्रकार बाळ बोठे, सागर भिंगारदिवे यांच्यासह सहा जण प्रमुख आरोपी आहेत. सागर भिंगारदिवे याला पत्नीच्या आजारपणाच्या कारणावरून अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने घातलेली जिल्हाबंदी ही प्रमुख अट असूनही, तो नगरमध्ये मुक्तपणे वावरत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी रुणाल जरे यांनी केली आहे.
अल्पवयीन मुलीला ट्रॅक्टर चालकाने पळवले; केडगाव परिसरातील घटना
लग्नाचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला ट्रॅक्टर चालकाने पळवून नेल्याचा प्रकार केडगाव परिसरात घडला. याप्रकरणी सोमनाथ बापू गोरे (रा. तोरकडवाडी, ता. कर्जत) या ट्रॅक्टर चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत केडगाव येथे राहते. आरोपी सोमनाथ गोरे हा तिच्या नातेवाईकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याचे पीडितेच्या घरी नियमित येणे-जाणे होते. ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घरातील सर्वजण झोपले असताना मुलगी अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मुलगी घरात न आढळल्याने नातेवाईक व परिसरात शोध घेण्यात आला, पण ती सापडली नाही. सुमारे आठ दिवसांनंतर पीडित मुलीने आपल्या मावसभावाला फोन करून, माझे सोमनाथवर प्रेम आहे. मी त्याच्यासोबत पळून गेले आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत, असे सांगितले व नंतर फोन बंद केला. या घटनेनंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन असून, तिचे अपहरण करण्यात आले आहे. सोमनाथ गोरेनेच फूस लावून पळवून नेले आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.
दोघा भावांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर टॅटू काढण्याचे दुकान लावण्याच्या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेला आणि चौघांनी मिळून दोघा भावांना लाकडी काठ्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिर परिसरात घडला आहे. याप्रकरणी पारस गुजरमल बावरीया (वय २५, रा. रेणुकामाता परिसर, मूळ रा. राजस्थान) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हंसराज बन्सी बावरीया, बच्चु बन्सी बावरीया, मिठालाल बन्सी बावरीया आणि भरतलाल बन्सी बावरीया या चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता, फिर्यादी पारस बावरीया आणि त्यांचा भाऊ रमेश बावरीया हे नवरात्रोत्सवानिमित्त रेणुकामाता मंदिर परिसरात टॅटूचे दुकान लावत असताना आरोपींनी त्यांना अडवले. किरकोळ वाद सुरु झाल्यानंतर आरोपींनी दोघा भावांना शिवीगाळ करत लाकडी काठ्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार पितळे करीत आहेत.
हाय-टेक ‘बिंगो’ जुगार अड्ड्यावर छापा
शहरातील नेप्ती नाक्याजवळील गाडगीळ मैदानावर उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हाय-टेक ‘बिंगो’ जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी मंगळवारी (दि. २३) दुपारी छापा टाकत एकाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनिष दत्तात्रय औशीकर (वय ३१, रा. संभाजी कॉलनी, रेल्वे स्टेशन रोड) असे आहे. तो ‘फन टार्गेट’ या मोबाइल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने संगणक स्क्रीनवर आकडे दाखवून लोकांकडून पैसे घेऊन हार-जीतीचा खेळ चालवत होता. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना, पोलीस हेडकॉन्स्टेबल रविकिरण सोनटक्के यांना या जुगार अड्ड्याविषयी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासह छापा टाकून ही कारवाई केली. घटनास्थळावरून पोलिसांनी एलसीडी स्क्रीन, संगणक, कीबोर्ड, माऊस, आणि रोख रक्कमेसह १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन आण्णासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.