अहमदनगर । नगर सहयाद्री:-
बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी येथे दिलेला शब्द पूर्ण करावा. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली पाणी योजना मार्गी लागावी यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी नगर दौड महामार्गांवर चिखली येथे रास्ता रोको करण्याच्या इशारा देण्यात आला आहे. साकळाई योजना मार्गी लागावी व त्यासाठी पाणी उपलब्धतेचा दाखला मिळावा यासाठी कृती समितीची गुरुवारी हिवरे झरे येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून सरकारचे लक्ष वेधन्यासाठी रास्तारोको करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
गेल्या 40-50 वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचा प्रश्न भीजत पडला आहे. लाभधारक क्षेत्रातील 35 गावांमधील नागरिकांनी योजनेसाठी वारंवार आंदोलन, उपोषण, मोर्चे, रास्तारोको, निवेदने देऊन सरकारला आठवण करुन देण्याचे काम केले आहे. परंतु, अद्यापही साकळाई योजनेला मूर्त स्वरुप आलेले नाही. दरम्यानच्या काळात गत लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता. त्यानंतरच्या काळात राज्यात सत्ताबदल झाल्याने साकळाई योजनेचा विषय मागे पडला. राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्याने माजी खासदार सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार दरबारी हालचाली करत साकळाई योजनेसाठी लागणारे पाणी कागदोपत्री उपलब्ध असल्याचे दाखविले.
त्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले यांनीही पाठपुरावा केला. तसेच साकळाईच्या सर्व्हेचे आदेश काढले. सर्व्हेक्षणासाठी निधी टाकून सर्व्हेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. याची गेल्या सहा महिन्यांपासून कृति समिती, अधिकारी पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजनेसाठी कृती समितीसह, शेतकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष हभप बाबा महाराज झेंडे, माजी उपसभापती प्रतावराव नलगे, समाजसेवक भापकर गुरुजी, नारायण रोडे, सोमनाथ धाडगे, दत्तात्रय काळे, प्रतिभा धस, रोहिदास उदमले, योगेंद्र खाकाळ, तुकाराम काळे, नवनाथ आनंदकर, विलास रनसिंग, सूर्यभान कोतकर आदींची नावे आहेत. आंदोलनाला सर्व लाभ क्षेत्रातील शेतकरी बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समीच्यावातीने करण्यात आले आहे.