अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पाथर्डी भागातील उपविभागीय कार्यालयात लाचखोरीचा एक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अभिषेक दत्तात्रय जगताप ( वय 35 वर्ष, रा. शास्त्रीनगर, शेवगाव) यांनी तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्यासाठी कार्यालयातील कारकून मोडसे मॅडम यांच्यासाठी लाचेची मागणी केली होती. रक्कम स्विकारताना लाच-लुचपतच्या विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
लाचखोरी प्रकरणाची तक्रार ०३ एप्रिल रोजी ४१ वर्षांच्या इसमाने तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या डंपर वाहनावर २ लाख ३६ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाची रक्कम त्यांनी २५ मार्च २०२५ रोजी भरली होती. मात्र डंपर वाहन सोडण्यासाठी आवश्यक असलेला आदेश उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांच्या कार्यालयात प्रलंबित होता.
याचवेळी आरोपी अभिषेक जगताप यांनी तक्रारदार यांना कारकून मोडसे मॅडम यांच्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता ३ हजार रुपये स्वीकारतांना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.