श्रीगोंदा । नगर सहयाद्री :-
तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ससाणे नगर येथे ०२ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर फटाके वाजविणे व मोटार सायकल जोरात चालविणे या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाले होते. राम शंकर ससाणे ( वय 48, रा.ससाणे नगर, श्रीगोंदा ) यांची हत्या झाली होती. हत्येपासून आरोपी फरार होता.
सदर गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आढावा घेऊन या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार विशेष पथक रवाना करण्यात आले होते. पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत पथकाला गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आतीक गुलामहुसेन कुरेशी (रा.खाटीकगल्ली, श्रीगोंदा ) हा आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचुन संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. त्यास गुन्हयाचे तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे.