जनसेवा फाउंडेशनतर्फे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्ह्यात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्रीगोंदा, शेवगाव, जामखेड, राहुरी आणि पाथर्डी तालुक्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामधील विजेत्या महिलांना खासदार सुजय विखे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
यामध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, वॉटर प्युरिफायर, सायकल यासह अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले, अभिनेत्री मानसी नाईक, महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल, रोहित माने आणि शिवाजी परब उपस्थितांचे मनोरंजन करणार आहेत.
असे असेल कार्यक्रमाचे नियोजन
राजू आणि प्रशांत अनासपुरे यांच्या यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा कार्यक्रम १ मार्च रोजी श्रीगोंदा येथील बाजारतळ, २ मार्च रोजी शेवगाव येथील खंडोबा मैदान, ३ मार्च रोजी जामखेड येथील जामखेड महाविद्यालय, ४ मार्च रोजी राहुरी येथील केशर मंगल कार्यालय (मल्हारवाडी रोड) आणि ०५ मार्च रोजी पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात होणार आहे. कार्यक्रमांची वेळ ही सायं. ६ वाजेची असेल. समस्त महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची रंगत वाढवावी असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.