अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
केडगाव येथील रंगोली चौकात अज्ञात आयशर टॅम्पोने जोरदार धडक दिल्याने 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतीश चंदू वाघ (रा. पिंपळगाव माळवी, अहिल्यानगर) असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात टॅम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश वाघ आपल्या मित्रासह होंडा शाईन मोटारसायकल (एम .एच ०८ ए. झेड. ४६२९) वरून केडगाव येथे कामासाठी गेले होते. रात्री परतत असताना रंगोली चौकात अहिल्यानगरकडून भरधाव वेगात आलेल्या आयशर टॅम्पोने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात सतीश वाघ खाली पडून गंभीर जखमी झाले, तर मित्र अनिल अर्जुन पवार किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर टॅम्पो चालक घटनास्थळावर न थांबता लिंक रोडने पळून गेला. सतीश यांना तत्काळ अहिल्यानगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानुसार अज्ञात टॅम्पो चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.