अहिल्यानगर । नगर सहयाद्री: –
नगर- मनमाड रस्त्यावरील विळद घाटात एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला असून 30 मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज शंभुराम राम (वय 24 रा. ड्रोली माठीयां, ता. दरोली, जि. सिवान, बिहार, हल्ली रा. विळद रेल्वे गेट जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात चंदन पनेश्वर राम (वय 34, रा. ड्रोली माठीयां, जि. सिवान, बिहार) याचा मृत्यू झाला आहे, तर विशाल यादव आणि राहुल चौहान (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 26 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावर विळद घाटात अज्ञात वाहनाने तिघांना धडक दिली.
या धडकेत चंदन पनेश्वर राम यांचा मृत्यू झाला असून विशाल यादव व राहुल चौहान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पंकज राम यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पितळे करीत आहेत.