संगमनेर । नगर सहयाद्री
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार करणार्या नराधमास वीस वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी सुनावली आहे. रवींद्र वसंत गोंधे (वय 27, रा. खालची माहुली, गोंधेवाडी, संगमनेर) असे नराधमाचे नाव आहे.
घारगाव पोलिसांत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन रवींद्र गोंधे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत आठ साक्षीदार तपासले. त्यावरुन आरोपीस कलम 376 (3) नुसार 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 20 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांनी भक्कम बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोकॉ. स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे, प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.
नेमकं प्रकरण काय?
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील एक अल्पवयीन मुलगी 12 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कच्च्या रस्त्याने शाळेत जात असताना तिच्या समोरून रवींद्र गोंधे हा दुचाकीवरून आला. त्याने तिच्यासमोर दुचाकी थांबवून म्हणाला, माझ्यासोबत घारगावला चल, त्यावेळी ती त्यास म्हणाली मला शाळेत जायचे आहे.
दोघांची ओळख असल्याने तो तिला म्हणाला मी तुला शाळेत सोडतो, तेव्ही ती दुचाकीवर बसली. त्यानंतर त्याने शाळेकडे न नेता घारगावच्या दिशेने दुचाकी नेली. त्यावेळी तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प बसण्यास सांगितले व महामार्गाने पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील वासुली येथे नेले. तेथील भाडोत्री खोलीसह वेगवेगळ्या ठिकाणी 12 डिसेंबर 2018 ते 1 जून 2020 पर्यंत लग्नाचे खोटे आमिष दाखवून व कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शारीरिक अत्याचार केला होता.