अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध ठेवले. संबंध करताना फोटो व व्हिडीओ शुटींग काढली व ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी (२९ डिसेंबर) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या संशयितासह त्याच्या पतीविरोधात अत्याचार, पोस्को, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सिध्देश संजय भस्मे, राणी सिध्देश भस्मे (दोघे रा. आनंदनगर, रेल्वे स्टेशन) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. फिर्यादी अहिल्यानगर शहरात राहते. तिची फेब्रुवारी २०२४ मध्ये राणी भस्मे सोबत ओळख झाली होती. माझे पती सिध्देश सुवर्ण प्राशन ड्रॉप मार्केटींगचे काम करत असून त्यांच्यासोबत तू मार्केटींगचे काम करत जा, तुला जास्त पैसे मिळतील असे राणीने फिर्यादीला सांगितले होते. तेव्हापासून फिर्यादी सिध्देश सोबत मार्केटींगचे काम करत होती. दरम्यान, फिर्यादीचे तिच्या मामाच्या मुलासोबत प्रेमसंंबंध होते.
याची माहिती सिध्देशला समजल्यानंतर त्याने त्याला फोन करून शिवीगाळ केली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये राणी घरी नसताना सिध्देशने फिर्यादीला त्याच्या घरी बोलून घेतले. तुझे मामाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे तुझ्या घरच्यांना सांगून तुझी बदनामी करीन, अशी धमकी देत सिध्देशने फिर्यादीवर बळजबरीने शरीर संबंध ठेवले. सप्टेंबर २०२४ मध्येही सिध्देशने फिर्यादीसोबत बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. शरीर संबंध करतेवेळी राणीने सिध्देशच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो व व्हिडीओ काढले. मारहाण करून तु जर याबाबत कोणाला काही सांगितले तर आम्ही तुझे फोटो व व्हिडीओ व्हायरल करून तुझी बदनामी करू अशी धमकी दिली.
त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये देखील सिध्देशने फिर्यादीला त्याच्या मित्राच्या रूमवर नेऊन फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. शेवटी पीडिताने हा सर्व प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला व सिध्देश व राणी विरोधात रविवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.