बीड / नगर सह्याद्री –
वाल्मीक कराड प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही. मी राजीनामा का देऊ, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कुणी आरोपी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असंही धनंजय मुंडे म्हणाले. मंत्रिमंडळातील बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. माजी सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असं धनंजय मुंडे यांनी आज स्पष्ट केले.
बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला पंधरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीय. पोलीस ठाण्यात रवानगी होताच, नवीन ५ पलंग मागवण्यात आले. ते पलंग नेमके कुणासाठी? यावर उत्तर देत धनंजय मुंडे म्हणाले, ‘ याबाबतीत पोलीस प्रशानानं स्टेटमेण्ट दिलेलं आहे. या ५ पलंग पूर्वीच मागवण्यात आलं आहे. घटना घडल्यानंतर किंवा आधी पलंग मागवण्यात आलेले नाही. या बाबतीत पोलीस स्टेटमेण्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.’
बीड प्रकरणात राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केलीय. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘मी राजीनामा का द्यावा? त्यासाठी काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये ना मी आरोपी आहे, ना या प्रकरणाशी कुठलाही संबंध आहे. या प्रकरणामध्ये आऊचा बाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा, अशा पद्धतीनं काही जण माझा राजीनामा मागत आहेत’. असं धनंजय मुंडे म्हणाले.
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, असं विजय वड्डेटीवार म्हणाले होते. यावर उत्तर देत, ‘विजय वड्डेटीवार बोलायला हुशार आहेत. छोटा आका, मोठा आका हे शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि सीआयडी अतिशय योग्य पद्धतीनं तपास करत आहेत. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा आमचा उद्देश आहे’. असं धनंजय मुंडे म्हणाले.
‘संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलीस, एसआयटी आणि सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. हा तपास न्यायालयीन होणार आहे. त्या तपासाची कुठलाही प्रकारचा प्रभाव मी मंत्री राहून होऊच शकत नाही. या प्रकरणी सीआयडी, एसआयटी आणि पोलीस, या तिन्ही प्रकराचा तपास सुरू आहे’. असं धनंजय मुंडे म्हणाले.