अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जमीन नावावर असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून शेवगाव येथील व्यापार्याची 2 कोटी 66 लाख 62 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अलिकडच्या काही वर्षात नगर शहरात ताबेमारी, फसणूक करून घरे, फ्लॉट, जमीन यांच्या विक्रीतील फसवणूकीच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात जयप्रकाश एकनाथ धूत (वय 42 रा. मारवाड गल्ली शेवगाव) असे फसवणूक झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी 21 फेब्रुवारी 2025 रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पवन पीटर पाटोळे, अनिता पीटर पाटोळे उर्फ अनिता दीपक वाघमारे, क्रांती पीटर पाटोळे, प्रियंका पिटर पाटोळे उर्फ प्रियंका संदीप खंडागळे सर्व रा. ख्रिस्ती गल्ली तारकपूर यांच्याविरुद्ध कलम 420, 417, 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै 2021 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान अप्पू हत्ती चौक परिसर लालटाकी येथे व इतर ठिकाणी घडलेली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
जयप्रकाश धूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 4 फेब्रुवारी 2020 रोजी न्यायालयाने रेगुलर सिव्हिल अपील क्रमांक 328/ 2015 चा निकाल देऊन पूर्वी पवन पाटोळे व इतरांच्या बाजूने न्यायालयाने दिलेला 182/ 2003 मधील निकाल रद्द केला. याची पूर्ण कल्पना असतानाही केवळ महापालिकेकडून नमूद क्षेत्रास सिटी सर्वे दप्तरी त्यांचे नाव लावण्यास उशीर झाल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी कट कारस्थान करून सदरची जमीन त्यांच्या नावावर आहे, असे आम्हाला भासवून त्यांच्या मालकीची नसलेली जमीन आम्हाला 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग दोन येथे खरेदी खत दस्त क्रमांक 8238/2022 अन्वये विक्री केली. त्या बदल्यात आमच्याकडून वेळोवेळी दोन कोटी 66 लाख 62 हजार 800 रुपये घेऊन आमची फसवणूक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.