श्रीगोंदा । नगर सहयाद्री :-
शिंदे सरकारची सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर पापाची दहीहंडी फोडून आलो आहे. आता शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या रूपाने सन २०२४ ची विधानसभा निवडणुकीत राजकीय हंडी फोडून मशाल पेटवणार अशी शिवगर्जना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
शिवसेना उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांच्या मागदर्शनाखाली सदा फाऊंडेशनच्या वतीने बुधवार दि. २८ रोजी दहीहंडी उत्सवाचे आयॊजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता शिव ठाकरे, संजीव राठोड, अभिनेत्री सई मांजरेकर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेत्री उर्मिला कोठरी, यांनी आपली अदाकारी दाखवून तरुणांची मने जिंकली. याप्रसंगी कार्यक्रमास आ. सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख विजय शेंडे, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, ऋषिकेश शिंदे, सुनंदा पाचपुते, सुदर्शन पाचपुते, उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे आज सकाळी सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावर जाऊन महायुती सरकारच्या पापाची दहीहंडी फोडून इथे आलो आहे. आपल्या मुंबईपेक्षा श्रीगोंद्यातील दहीहंडीला तरुणांचा खूपच मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत साजन पाचपुते यांच्या रूपाने राजकीय दहीहंडी फोडून मशाल पेटवणार असल्याने सर्वांनी तयारीला लागा असे आवाहन युवा सेना प्रमुख आमदार ठाकरे यांनी केले. सदा फाऊंडेशन आयोजित दहीहंडी उत्सवासाठी १ लाख ११ हजार १११ रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जर्मनीतून खास कलर डिस्प्ले लेझर लाइटिंग आणि खास साऊंड सिस्टिम मागवण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती वाघमारे यांनी केले तर शेवटी तालुका उपप्रमुख निलेश साळुंखे यांनी आभार मानले.
“अभी नही तो कभी नही”
शिवसेनेचे उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांनी उपस्थित असलेल्या तरुणांशी संवाद साधला. तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात का? मि नेता नाही तर तुमचा मित्र आहे. शर्टाची कॉलर धरुण हक्काने काम सांगायचं तसे असेल तरच आदित्य साहेबांना हात उंचावून सांगा. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी हात उंचावून सांगितले की अभी नही तो कभी नही श्रीगोंद्याचा आमदार फक्त साजन भाई अशा घोषणा देत तरुणांनी डिजेच्या तालावर ठेका धरला होता.