शरीरास हानिकारक पदार्थांची विक्रीही जोमात
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर शहरात शाळा, महाविद्यालयाच्या आवारात गुटखा विक्रीवरून मागील काही दिवसांपूर्वी मोठे रान उठले होते. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना मारहाण केल्यानंतर ही बाब प्रकर्षाने पुढे आली. परंतु आजही ही समस्या कायम असल्याचे दिसून येते. या सर्व गोष्टींकडे अन्न व औषध प्रशासन विभाग पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ, मावा विक्री तेजीत आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा टपर्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासन विभागाला त्याचे काहीही देणे घेणे नाही असेच चित्र सध्या आहे. तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत असतानाही अन्न व औषध प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. जिल्ह्यात शरीरास घातक असलेल्या विविध पदार्थांची विक्री देखील जोमात सुरु आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या आवारात अवैध धंदे
शाळा, महाविद्यालयाच्या आवारात शंभर मीटरच्या आत गुटखा, मावा, मद्य विक्रीला बंदी आहे. तसे राज्य शासनाचे परिपत्र आहे. तरीही नगर शहरात शाळा, महाविद्यालयाच्या आवारात अवैध गुटखा व मावा विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक नामांकित महाविद्यालये, शाळा यांच्या आवारात ही विक्री सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा टपर्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे सपशेल डोळेझाक केल्याचे दिसते.
सावंतवाडी येथे मोठी कारवाई, वेगवेगळ्या छाप्यात १ कोटींचा मुद्देमाल जप्त
सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी येथून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे गुटखा पानमसाला वितरीत होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई स्थित मुख्यालयातील दक्षता विभागास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांनी सावंतवाडी येथे ६ मार्च रोजी धाड टाकली.
चंद्रशेखर पांडूरंग नाईक यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये विमल पानमसाला व व्ही वन तंबाखू चा साठा आढळून आला. हा मुद्देमाल ४५ लाख १३ हजार ६०० रुपयांचा होता. तसेच चंद्रशेखर नाईक यांचा मुलगा गजानन उर्फ गौरव नाईक यांच्या गौरव एजन्सी (सावंतवाडी) येथे टाकलेल्या छाप्यात गुटखा, विमल पानमसाला, आरएमडी गुटखा, सुगंधीत तंबाखू असा ५८ लाख ६ हजार ९४३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुंदर कुबन, गजानन उर्फ गौरव नाईक, चंद्रशेखर नाईक, राहुल मटकर, सचिन व्यवहारे, वामन हलारी आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई आयुक्त, अन्न व औषध प्रशासन अभिमन्यू काळे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) गुप्तवार्ता उल्हास इंगवले यांच्या नियंत्रणात अरविद खडके, निलेश विशे, इम्रान हवालदार, राहुल ताकाटे, मंगेश लवटे, महेश मासाळ, आदींनी केली.