अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी केले. बहुतांश मंडळांनी धार्मिक, ऐतिहासिक आणि जीवंत देखाव्यांना पसंती देत पाचव्या दिवसांपासून गणेश भक्तांसाठी आरस पाहण्यासाठी खुली केली. शनिवारी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार असल्याने गुरुवारी अन शुक्रवारी गणेश भक्तांनी आरस पाहण्यासाठी मोठी गद केली होती. सायंकाळी रस्ते गदने फुलून गेले होते. दरम्यान गणेशउत्सवापूवच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्याने यंदाचा गणेशोत्सवात निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन पहावयास मिळाले. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना वर्गणीही भरमसाठ मिळल्यानेही मंडळांनी डीजेचा नाद केला.
नगर शहराचा पहिला मानाचा गणपती तथा ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते शनिवारी (ता. 4) सकाळी उत्थापना पूजा होणार आहे. त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. विशाल गणपतीनंतर मानाची गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक दुकाने व इतर आस्थापनांच्या कॅमेऱ्यांची ही मदत मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी घेतली जाणार आहे.
मिरवणूक मार्ग व त्या लगतच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा देखील वापर होणार आहे. मिरवणुकीत जवळपास 16 मंडळे सहभागी होणार आहेत. उपनगर, सावेडी उपनगर परिसरातही अनेक मंडळे स्वतंत्र मिरवणुका काढणार आहेत. शहरासह जिल्ह्याभर सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. तशा सुचना पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या आहेत.
शहरासह जिल्ह्यात 3 हजार 196 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध कार्यक्रम घेत गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा केला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी मंडळांकडून करण्यात आली आहे.
श्री विशाल गणेश मंदिर परिसर सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमला
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वीणा दिघे, अमृता बेडेकर, सरोज पालडिया, अनिता इवले, सोनाली भांडेकर, पूनम ताठे, सोनाली पुंडे, अंजली दंडवते, जोत्स्ना जामगावकर, आसावरी नातू, अश्विनी वाळुंजकर आदींनी अथर्वशीर्ष पठणास प्रारंभ केला. यावेळी रेखा झंवर व त्यांच्या सहकारी महिलांनी शंखनाद केला. या अथर्वशीर्ष पठणामध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषा, एक ताल-सुरात अथर्वशीर्ष पठणाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात महिलांचा सन्मान केला, त्यानंतर महाआरती करुन प्रसाद वाटपाने सांगता झाली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबिरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, माणिकराव विधाते, संजय चाफे, नितीन पुंड आदींसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते.

गणपती विसर्जनासाठी महापालिकेकडून सोय
बाळाजीबुवा विहीर (कल्याण रोड), यशोदानगर विहीर (पाईपलाईन रोड), साईनगर (भोसले आखाडा), गांधीनगर रोड (भारत बेकरी चौक, बोल्हेगाव), साईबाबा मंदिर खुली जागा (निर्मलनगर), सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान (सावेडी), कल्याण रोड व सीना नदी येथील आयुर्वेद उद्यानातील मोकळी जागा, सारसनगर (भिंगार नाला पुलाशेजारी), शिवनेरी चौक (स्टेशन रोड), गोविंदपुरा, फकीरवाडा (मारुती मंदिरजवळ), भिस्तबाग महालजवळ (दोन ठिकाणी), गांधी मैदान पटांगण, पांजरपोळ पटांगण (मार्केट यार्ड), दाणेडबरा, मोतीनगर खुली जागा (केडगाव), आंबेडकर सांस्कृतिक भवन (केडगाव देवी रोड), देवी मंदिरासमोरील जागा (केडगाव), भूषणनगर (पाण्याच्या टाकीजवळ, केडगाव).
लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगणेशोत्सव व ईद-ए-मिलाद 2025 या कालावधीत लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील. हे आदेश 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी प्रभावी असतील. जिल्ह्यातील मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या वापरामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अशा साधनांच्या वापरामुळे मानवी श्वसन संस्थेला हानी पोहोचणे, हृदयाचे ठोके वाढणे, कानाच्या पडद्यांवर तसेच लहान मुलांच्या डोळ्यांवर बरे न होणारे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते.
5848 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरासह जिल्ह्यातील 580 गाव गुंडांना मिरवणूक होईपर्यंत तडीपार करण्यात आले आहे. तसेच पाच हजार 848 जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.