अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
नगर- मनमाड महामार्गावरील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोल्हेगाव फाटा परिसरात एका 36 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सकाळी उघडकीस आली आहे. दगडाने ठेचून युवकाचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
अश्विन मारुती कांबळे (वय 36, रा. जत्राड, ता.निपाणी, जि. बेळगाव, हल्ली रा. गणेशनगर, नागापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बोल्हेगाव फाटा परिसरात स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या बाजूला असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये ही घटना घडली. एआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी असल्याने अनेक परप्रांतीय कामानिमित्त येथे वास्तव्यास आहेत.
कामगारांधील आपसातील वाद यामुळे यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. शनिवारी सकाळी पुन्हा दगडाने ठेचून युवकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, खुनाचे कारण अद्याप समजले नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी केली. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.