अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. भोयरे पठार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या परिसरात हा मृतदेह आढळून आला असून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
चास शिवारात भोयरे पठार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याचा गळा आवळून खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर मृत तरुणाचे अंदाजे वय 30 वर्षे आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. जर कोणास या तरुणाबाबत काहीही माहिती असेल, तर त्यांनी तातडीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.