अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कोतवाली पोलिसांच्या रात्र गस्त पथकाने शुक्रवारी (28 मार्च) पहाटे कारवाई करून गांजा विक्रीसाठी आणलेल्या युवकाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत एक लाख 10 हजार 640 रूपये किमतीचा नऊ किलो 200 ग्रॅम गांजा आणि 65 हजार रूपये किमतीची दुचाकी असा एकूण एक लाख 75 हजार 640 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरूवारी (27 मार्च) रात्री 10 वाजेपासून कोतवाली पोलिसांची गस्त सुरू होती. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर एक इसम निळ्या रंगाच्या सुझुकी मोपेड दुचाकीवर निळ्या रंगाची गोणी घेऊन जात असताना संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांचे वाहन पाहून त्याने दुचाकीचा वेग वाढवून अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या मोकळ्या पटांगणात दुचाकी घातली.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने गोणीची तपासणी करण्यात आली. गोणीत हिरवट रंगाचा, उग्र वास असलेला गांजा आढळून आला. तपासादरम्यान त्याचे नाव साहिल संतोष सूर्यवंशी (वय 20, रा. वाघ गल्ली, नालेगाव) असे असल्याचे समोर आले. त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहा. पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, अंमलदार विशाल दळवी, संदीप पितळे, रोहिणी दरंदले, दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सोमनाथ केकान, महेश पवार, सचिन लोळगे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सोमनाथ राऊत, अभय कदम, संकेत धिवर, प्रतिभा नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.