अहिल्यानगर / नगर सह्याद्री
विळद घाट (ता. अहिल्यानगर) परिसरात आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरूणाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. जगदीश पांडुरंग चव्हाण (वय 38 रा. विळद घाट, ता. अहिल्यानगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (12 मे) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. जगदीश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम ईश्वर साळुंके (रा. निंबळक, ता. अहिल्यानगर) व अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओम साळुंके याने तु माझ्या वडिलांचे घेतलेले पैसे कधी देतोस या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने पोटावर व पाठीवर मारहाण केली. त्याचप्रमाणे त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी इसमाने देखील लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी फिर्यादीसोबत असलेल्या त्यांच्या पत्नी मोहिणी यांनाही संशयित आरोपीने शिवीगाळ व मारहाण केली, तसेच दोघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर जगदीश यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करीत आहेत.