पुणे । नगर सहयाद्री:-
पुण्यातील हांडेवाडी – मंतरवाडी मार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एक युवक अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे समजते. सिमेंट मिक्सर ट्रकने अंगावरून गेल्यामुळे अपघात अतिशय भीषण स्वरूपाचा होता.
मृतांची नावे संतोष प्रल्हाद कांबळे (वय ४९, रा. हांडेवाडी रोड, मूळ गाव – अहिल्यानगर) आणि सदाशिव गोरख फुलावळे (वय ३६, रा. उरुळी देवाची) अशी असून, हे दोघे दुचाकीवरून हांडेवाडीहून मंतरवाडीच्या दिशेने जात होते. दुर्दैवाने एचपी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली. त्याच वेळी मागून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रक (चालक – नागेश नाना कोरडे, वय ३५, रा. उफळाई, ता. म्हाडा, सोलापूर) याने जोरदार धडक दिली.
धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला फेकली गेली, तर दोघेजण दुसऱ्या बाजूला पडले, आणि त्याच वेळी ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. या भीषण घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, हांडेवाडी-मंतरवाडी मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.