अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना घडली. या घटनेत घरातील सर्व सामानाचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,आरोपी जयराम कचरू बेरड, विकास कचरू बेरड, अंबादास बाबुराव बेरड आणि शैलेश रामदास भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी खंडोबा मंदिराजवळ घडला. याप्रकरणी परीघा मच्छिंद्र कराळे यांनी फिर्याद दिली. सकाळी स्वतःच्या घरात जेवण करत असताना वरील आरोपींनी जेसीबी वाहन आणून त्यांचे घर पाडण्यास सुरुवात केली. या घटनेत घरातील सर्व सामानाचे नुकसान करून, घर जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे पाडले. त्यामुळे घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी. बी. पालवे हे करत आहेत.
घर बांधण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ पतीसह चारांविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नानंतर घर बांधण्याच्या आणि पैशांच्या वादातून एका २६ वर्षीय विवाहिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती संकेत फुलसौंदर, सासू अलका फुलसौंदर, सासरे ज्ञानदेव फुलसौंदर आणि दीर शुभम फुलसौंदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेचा विवाह ३१ जानेवारी २०२३ रोजी यशोदा नगर, पाईपलाईन रोड येथील संकेत ज्ञानदेव फुलसौंदर यांच्याशी झाला होता. सुरुवातीचे आठ-दहा दिवस सासरच्या मंडळीने चांगले नांदवले असले तरी, त्यानंतर सासरकडून तिला सतत शिवीगाळ व धमक्या दिल्या जात होत्या. फेब्रुवारी २०२३ मध्ये महिलेला किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला, परंतु उपचारासाठी पती आणि सासरकडून आर्थिक मदत मिळाली नाही. उलट तुझ्या माहेरहून पाच लाख रुपये आण, नाहीतर तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. फेब्रुवारी २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत हा छळ सुरू होता. अखेर त्रास असह्य होताच महिलेने भरोसा सेलमध्ये तक्रार नोंदवली आणि पत्र मिळाल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
राहुरी तहसिल आवारातून भरदिवसा चोरी गेलेल्या ९ लाख रुपये किमतीच्या डंपर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीमध्ये भगवान गोवर्धन कल्हापुरे (वय ३८, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी), सोमनाथ नामदेव ठाणगे (वय ३१, रा. देहरे, ता. अहिल्यानगर), आणि अविनाश भिकन विधाते (वय २९, रा. ताहाराबाद, ता. राहुरी) यांचा समावेश आहे. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहुरी तहसिल परिसरात उभा केलेला एक विनानंबरचा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी प्रशांत सयाजी ओटी (वय ३७, रा. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीने संशयित आरोपीना जेरबंद केले. चौकशीदरम्यान, आरोपी सोमनाथ ठाणगे याने हा डंपर भगवान कल्हापुरे याच्या सांगण्यावरूनच चोरल्याची कबुली दिली. पथकाने त्यांच्याकडून ९ लाख रुपये किमतीचा विनानंबरचा डंपर जप्त केला. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.



