दीड लाखांचे दागिणे घेऊन पसार | तोफखान्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेला दोन अज्ञात इसमांनी फसवून तब्बल दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. पंकज कॉलनी, समतानगर येथील रहिवासी रजनी अशोक कुद्रे (वय ७३) या नेहमीप्रमाणे गुलमोहर रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. स्वामी समर्थ मंदिराजवळ त्या पोहोचल्या असता, मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले.
त्यातील एक इसम म्हणाला की, पुढे खून झाला आहे, तुम्ही पुढे जाऊ नका, अंगावरील सर्व दागिने काढून टाका. या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून महिलेने आपले दागिने काढून दिले.यानंतर इसमांनी दागिने सुरक्षित ठेवतो असे सांगून ते एका पिशवीत ठेवले आणि दुसर्या साथीदारासह मोटारसायकलवर बसून फरार झाले.फिर्यादीकडून सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची साखळी, मनिमंगळसूत्र असे एकूण ३३ ग्रॅम वजनाचे, १ लाख २६ हजार ३१५ रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले.या घटनेनंतर वृद्ध महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.