जामखेड । नगर सहयाद्री
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एक भीषण अपघात घडला. दोन महिलांना भरधाव पिकअपने धडक दिली, ज्यात एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी गंभीर जखमी झाली. स्मिता दिलीप रणभोर आणि वर्षा प्रकाश दिंडोरे या दोघी भूम रोडवर फिरण्यासाठी चालत होत्या. त्या माघारी खर्डा येथून येत असताना, पिकप एमएच १४ एमएच ०१३५ या गाडीने त्यांना मागून धडक दिली.
धडकेत स्मिता रणभोर यांचा जागीच मृत्यू झाला, तर वर्षा दिंडोरे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कै. स्मिता रणभोर हे एक कष्टाळू महिला म्हणून परिचित होत्या. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता, आणि त्यांच्या निधनाने खर्डा शहर आणि जामखेड तालुका शोकाकूल झाला आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
घटनेच्या नंतर पिकप ड्रायव्हर गाडी घेऊन जामखेडकडे पलायन झाला. खर्डा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेल्या गाडीच्या नंबरच्या आधारे ड्रायव्हरला मिरजगाव येथून पकडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.