अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भिंगार परिसरातील एम.आय.आर.सी. क्वार्टर्स येथील एका महिलेची फ्लिपकार्ट कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने सुमारे तीन लाख 30 हजार 470 रूपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 मार्च ते 25 मार्च 2025 या कालावधीत ही घटना घडली आहे. फिर्यादी त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांना मोबाईलवर एक कॉल आला. कॉल करणार्या व्यक्तीने स्वत:ला फ्लिपकार्ट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत गुंतवणुकीवर भरघोस लाभ मिळेल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने गुगल पे लिंकव्दारे वेगवेगळ्या खात्यांवर एकूण तीन लाख 30 हजार 470 रूपयाची रक्कम पाठवली.
मात्र, काही दिवसांनी कोणताही परतावा रक्कम न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार मिसाळ करीत आहेत.