बारामती | नगर सह्याद्री
बारामतीमध्ये परिवर्तन होईल ही, काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. बारामतीमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आहे, ती १०० टक्के फिरवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बारामतीमधील नागरिकांना आवाहन करत सुनेत्रा पवार यांचा विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
गुरुवारी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. बारामतीत महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे.
यावेळी एकनाथ शिंदेंनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, बारामतीमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आहे, ती १०० टक्के फिरवा. ही लोकसभा निवडणूक असली तरी देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. महायुतीच्या उमेदवाराचा विजय महत्वाचा आहे.
दरम्यान, शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर देखील शिंदेंनी भाष्य केलंय. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटतं त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. सुनेत्रा वहिनी उत्तम खासदार होतील त्यांनी भरपूर चांगली कामे केली आहेत, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.
बारामतीच्या विकासात अजित पवारांचे मोठं योगदान आहे. जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा अजित पवार यांच्यावर अन्याय झाला. मोदींवर विश्वास ठेवून अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झालेत. मोदींनी म्हटलं होतं पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारणात आलो, पण त्यांनी बोट सोडले आणि देशाचा विकास केला. तसे आता अजित पवार यांनी पवार यांचं बोट सोडलेल आहे, त्यामुळे ते विकासासोबत आले आहेत, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटले.