अहिल्यानगर । नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील पीव्हीपी कॉलेज चौकात जादूटोण्याचा प्रकार मंगळवारी समोर आला असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लोणी बुद्रुक येथील कैलास विखे मंगळवारी सकाळी खासगी कामासाठी बाभळेश्वरकडे जात असताना पीव्हीपी कॉलेज चौकात दोन टोपली भरलेली हळद-कुंकू आणि त्यांना टाचण्या लावलेल्या दिसून आल्या.
हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोणी पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोणी खुर्द ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी रिक्षा बोलावून घेतली आणि त्यात सर्व लिंबू आणि टोपल्या टाकून दिल्या. लोणी गाव हे शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. या ठिकाणी असा प्रकार होणे धक्कादायक आहे.
मुळात जादूटोणा विरोधी सक्षम कायदे शासनाने केलेले आहेत. तरीही असे प्रकार होत असतील तर त्याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. हे कृत्य कुणी केले आणि कशासाठी केले याचा शोध लोणी पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. लोणीतील सुज्ञ नागरिकांनी तशी मागणी केली असून पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यायला हवा.