कोतकर, कळमकर, गाडे, काळे, फुलसौंदर, बोराटेंचे अर्ज दाखल / शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज दाखल केले. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माजी महापौर सुवर्णा कोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, गोरख दळवी, मंगल भुजबळ, मनसेकडून सचिन डफळ यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदार होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून रविवारी माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. परंतु, कळमकर यांचे नाव जाहीर होताच शिवसेना व काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. तसेच बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, वसंत लोढा, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, मनसेचे सचिन डफळ, इंजि. विजयकुमार ठुबे, किरण काळे, गोरख दळवी, मंगल भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे कोण कोण उमेदवारी अर्ज माघारी घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.