अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील भराड गल्ली, तोफखाना, चितळे रोड परिसरात एका 22 वषय तरुणीचा पाठलाग करून चाकूचा धाक दाखवण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अभिषेक चंद्रकांत म्याना, त्याची आई आणि आत्या (पूर्ण नाव माहित नाही), रा. भराड गल्ली, यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, हा प्रकार 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पावणे नऊ वाजता घडला. तरुणी आपल्या मोपेडवरून एमआयडीसी येथील प्रथमेस इंडस्ट्रीज कंपनीत कामावर निघाली असताना, अभिषेक म्याना याने त्याच्या मोपेडवरून तिचा पाठलाग केला. पद्मावती टी-पॉईंटजवळ त्याने तिला थांबवत पँटच्या खिशातून चाकू काढला. तरुणी डी-मार्टमार्गे भिस्तबाग रोडवरून घरी परतताना पुन्हा अभिषेकने तिचा पाठलाग केला.
घरी पोहोचल्यावर तरुणीने हा प्रकार आई व काकांना सांगितला. त्यांनी अभिषेकच्या घरी जाऊन विचारणा केली असता, अभिषेकच्या आई आणि आत्या यांनी वाईट शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी अभिषेकने पुन्हा चाकू दाखवत, तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तरुणीच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.