अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात दुचाकीवर चाललेल्या प्रवाशाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मारहाणीत जखमी झालेल्या युवराज दत्तपंत नाईकवाडे (वय ३७, रा. खेर्डा बुद्रुक, ता. गेवराई, जि. बीड, हल्ली रा. डेरंगे वस्ती कोरेगाव भीमा, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्या जबाबावरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, युवराज नाईकवाडे हे कामानिमित्त कोरेगाव भीमा येथे वास्तव्यास असून ते २७ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या मूळ गावाहून नगरमार्गे कोरेगाव भीमाकडे त्यांच्या बजाज डिस्कव्हर कंपनीच्या मोटारसायकल (क्र. एम एच २३ व्ही २३५१) ने रात्री १२ च्या सुमारास कामरगाव शिवारातून जात होते. हॉटेल सुवर्णज्योत जवळ त्यांना दोन चोरट्यांनी अडवून दगड व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने ते जखमी झाले. चोरट्यांनी त्यांच्याकडून ८ हजार रुपये रोख रक्कम, मोटारसायकल व दोन मोबाईल असा ऐवज चोरून नेला. घटनेनंतर जखमी झालेल्या नाईकवाडे यांना नागरिकांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते.याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.