अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जमिनीच्या जुन्या वादाचा राग मनात धरून पाच नातलगांनी दोन सख्ख्या बहिणींना मारहाण केली, त्यापैकी एका १८ वर्षीय दिव्यांग तरुणीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना शहरातील धुसागर सोसायटीजवळील डोंगरावर गुरुवारी दुपारी घडली.याप्रकरणी राहुल काळे, तुकाराम चव्हाण, योगेश चव्हाण, दुर्गेश चव्हाण आणि रितेश चव्हाण या पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, पीडित तरुणी व तिची बहीण गुरुवारी दुपारी २ वाजता डोंगरावर बकऱ्या चारण्यासाठी गेल्या असताना आरोपींनी त्याठिकाणी येऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पीडितेची बहीण कशीबशी निसटून गेली, मात्र दिव्यांग असल्याने पीडित तरुणी पळू शकली नाही. आरोपींनी तिला खाली पाडून मारहाण केली तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित तरुणीचे वडील सध्या तुरुंगात असून, त्यांच्यावर जमिनीच्या वादातून खटला सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी न्यायालयात गेल्याचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर पीडित तरुणीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.