जामखेड । नगर सह्याद्री:-
कार डिव्हायडरला धडकल्यामुळे सीएनजीने पेट घेतला अन् दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सदरची घटना सोमवार दि.24 रोजी पहाटे जामखेड शहरातील बीड रस्त्यावर घडली. पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल, महादेव दत्ताराम काळे दोघे (रा. जामखेड, जि अहिल्यानगर) अशी मृताची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल यांच्यासह महादेव काळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातुन बीड रस्त्याने जामखेड शहराच्या दिशेने येत होते. त्यांच्या चारचाकी वाहनाने एका हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली. कार अत्याधुनिक असल्यामुळे अपघातानंतर लॉक झाली, त्यानंतर 150 फूटावर कार फरफटत गेली. त्यामुळे सीएनजीने पेट घेतला, अन् कारमध्ये आग लागली. आग इतकी भीषण होती, की कार जळून खाक झाली. यामध्ये धनंजय गुडवाल व महादेव काळे यांचा मृत्यू झाला.सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.
रस्त्याचा प्रश्न माग लावा!
दोन वर्षापासून अपुर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडर साठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात. यामुळे गाडी डिव्हाइडर वर आदळून पेट घेतल्याने गाडीसह दोघे जळून खाक झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता प्रश्न माग लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.
अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात!
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनास बोलवण्यात आले. जामखेड नगरपरिषदच्या अग्रिशमन दलातील आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख यांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाड़ीने पुर्ण पेट घेतला होता.
मोबाइलवरून पटली ओळख!
कार अत्याधुनिक असल्यामुळे अपघातानंतर लॉक झाली, त्यामुळे आतमध्ये असणाऱ्या दोघांना बाहेर पडता आले नाही. कारबरोबर दोघेही जळून खाक झाले, त्यांना ओळखणेही शक्य झाले नाही. मोबाईलवरून ओळख पटवण्यात आली. अपघातात पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल पडलेला होता, त्यामुळे ते एक असावेत व गाडी मालक काळे असे दोघे असावेत असा अंदाज पोलिसांनी लावला आहे.