जामखेड । नगर सहयाद्री
बारावी परिक्षा पास झाल्यानंतर कोणतेही लाज न बाळगता चहाच्या दुकानात सहा वर्षे काम केले. यानंतर जामखेड नगर रस्त्याच्या कडेला दोन बाकडे व खूर्च्या टाकून अल्प खर्चात चहाचा व्यवसाय एका वडाच्या झाडाखाली सुरू केला. तर पत्नी राधीका ही शेती पाहायची. मुले लहानचे मोठे होत असताना त्यांची बुध्दीमत्ता पाहुन दोन्ही मुलांना शेती व चहाच्या दुकानात न आणता त्यांच्या शिक्षणावर भर दिला. या दोन्ही मुलांनी आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले. थोरल्या मुलगा एमबीबीएस डॉक्टर झाला तर दुसरा मुलगा एमबीबीएसच्या दुसर्या वर्षाला आहे. 25 वर्षे चहाचा व्यवसाय करताना चहाचा स्वताचा एक ब्रॅण्ड जामखेडमध्ये केला.
जामखेड पासून नऊ कि. मी. अंतरावर असलेल्या मातकुळी (ता. आष्टी, जि. बीड) येथील तरूण प्रकाश उर्फ बंडु ढवळे याने जामखेड येथे बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर नौकरीची व शिक्षणाची लाज न बाळगता चहाच्या दुकानावर कामावर राहतो. सहा वर्षे एकाच चहाच्या हॉटेलवर काम केल्यानंतर स्वतःचा चहाचा व्यवसाय करण्यासाठी एका वडाच्या झाडा खाली दोन बाकडे व चारपाच खुर्च्या टाकून स्वताचा व्यवसाय सुरू करतो.
चहा करण्याची कला अवगत असल्याने नागरीकाबरोबर तालुक्यातील व तालुक्याबाहेरील मोठमोठे पुढारी यांनी चहाची चव घेतली. स्वताचा व्यवसाय सुरू झाल्या नंतर राधीका नावाच्या मुलीशी लग्न झाले. दोन मुले झाली. चहाचा व्यवसाय उघड्यावरच वडाच्या झाडाखाली असताना सर्व पक्षिय नेते, कार्यकर्ते एकत्र चहा घेत असल्याने “पुढारी वड” म्हणून प्रसिद्ध झाला व येथील चहाची ख्याती सर्वत्र पसरली.
छोट्याशा चहाच्या व्यावसायावर व अडचणींचा सामना करताना प्रकाश उर्फ (बंडु) ढवळे यांनी यांनी आपले मुले थोरला प्रदीप व धाकटा रोहीत या दोन्ही मुलांचे शिक्षण मातकुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केले. यानंतर जामखेड येथे पाचवी ते बारावीचे शिक्षण ल . ना . होशिंग विद्यालयात झाले प्रदीपने नेट परिक्षा दिली. नेट परिक्षेत मिळालेल्या गुणामुळे त्याचा मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल मेडीकल कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातून नंबर लागला घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या प्रदीपने मेहनतीने, चिकाटीने स्वतःला सिद्ध केले आहे.
शेतात आई काबाड कष्ट करते तर वडील चहाचे दुकान चालवतात आशा आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवत प्रदीपने साडेपाच वर्षाच्या शिक्षणानंतर एमबीबीएसची ही पदवी प्राप्त करून आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. डॉ. प्रदीप याचे हे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण जामखेड व आष्टी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही. हे या यातुन सिध्द होत आहे.
दुसरा मुलगा देखील एमबीबीएसच्या दुसर्या वर्षाला
प्रकाश उर्फ बंडु ढवळे यांचा दुसरा मुलगा रोहीत हा सुध्दा हुशार आहे. बारावीनंतर नेट परिक्षा दिल्यानंतर त्याला चांगले मार्क मिळाले व त्याचा नंबर इस्लामपूर ( जिल्हा सांगली) येथील निमशासकीय प्रकाश हॉस्पिटल ॲंन्ड रिसर्च सेंटर या कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी लागला. त्याचे आता द्वितीय वर्ष चालू असून भविष्यात तो एमबीबीएस डॉक्टर होणार आहे.