अहमदनगर | नगर सह्याद्री
आगामी विधानसभा निवडणूक लढवायचीच या हेतूने नगर-पारनेर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली. भेटीदरम्यान पवार यांनी तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मी प्रचाराला येईल असे आश्वासन दिले.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून इच्छूकांकडून उमेदवारीसाठी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. पारनेर-नगर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी तयारी चालविली आहे. तर ठाकरे गटाकडून उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी तयारी चालविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते ते पहावे लागणार आहे.
पारनेर-नगर विधानसभा मतदासंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघाचा आढावा कार्ले यांनी दिला. शिवसेनेची नगर तालुक्यात मोठी ताकद आहे. पारनेरची जागा शिवसेेना ठाकरे गटाला सोडल्यास श्रीगोंदा, राहुरी आणि पारनेर या तीनही मतदारसंघात मोठा फायदा होईल असे मत कार्ले यांनी मांडले.
दरम्यान शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली तर मी पारनेरला प्रचाराला येईल असे आश्वासन दिले. तीन दिवसांपूव जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जयंत वाघ यांनी पवारांची भेट घेतली होती.