अहिल्यानगर । नगर सहयाद्री
माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी एक हृदयद्रावक घटना अहिल्यानगरमधील माळीवाडा परिसरात उघडकीस आली आहे. सुमारे चार वर्षांचा चिमुकला एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाडीत बेवारस अवस्थेत आढळून आला. या मुलाला चार महिने उलटूनही कोणीही आपलंसं मानलं नाही, आणि अखेर पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
५ मे २०२५ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास, माळीवाड्यातील राज ट्रॅव्हल्सजवळ पार्क करण्यात आलेल्या गाडी (क्र. एमएच २० झेडसी २९९९) मध्ये एक लहान मुलगा एकटाच सापडला. ही माहिती अमरावती येथील प्रवासी रिझवान हापीस खान यांनी तात्काळ कोतवाली पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला ताब्यात घेतले.
त्यानंतर त्या मुलाचे नातेवाईक आणि पालकांचा संपूर्ण शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेण्यात आला, मात्र कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. पालकांनीच त्याला मुद्दाम बेवारस सोडल्याचा संशय पोलिसांना आला. अखेरीस, पोलीस कॉन्स्टेबल अमोल दिलीप गाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.