अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन अहिल्यानगर स्थानकावर रात्री 9.00 वाजता झाले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. या सेवेमुळे जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून, वेळ व खर्च वाचणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू-बेलगावी, अमृतसर-श्री माता वैष्णो देवी कटरा व गाडी क्रमांक 01001 नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस या तीन गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे सभापती प्रा. शिंदे म्हणाले, परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे. ही सेवा देशभर लोकप्रिय झाली आहे. नागपूर-पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे आहे. विद्याथ, व्यापारी व पर्यटकांसाठी ही सोयीची ठरणार आहे.
पुण्याकडे जाताना रांजणगाव व सुपा परिसरापासून वाहतूक कोंडी सुरू होते. त्यामुळे वेळ व पैसा वाचेल आणि प्रवास अधिक सुखद व जलद होईल. संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे महामार्ग सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. तसेच, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या विनाकारण दौंडमार्गे जाण्याऐवजी थेट पुण्यात याव्यात, यासाठी अहिल्यानगर-संभाजीनगर-पुणे असा नवीन रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी खासदार निलेश लंके यांनीही मनोगत व्यक्त केले. पदमसिंह जाधव यांनी वंदे भारत रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. अहिल्यानगर येथे आगमन झाल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभास खासदार निलेश लंके, रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक पदमसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता विकास कुमार, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभय आगरकर, योगीराज गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आजचा दिवस नगरकरांसाठी अविस्मरणीय क्षण; खा. लंके
नगरकरांसाठी आजचा दिवस हा अविस्मरणीय क्षण आहे. नागपूर ते पुणे या 881 किलोमीटरच्या प्रवासात ही गाडी 12 ठिकाणी थांबणार असून त्यात अहिल्यानगर स्थानकाचा समावेश आहे. रेल्वे मंत्र्यांनी या मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. माझ्या राजकीय आयुष्यात असे कार्यक्षम मंत्री मी कधीही पाहिले नाहीत. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण रेल्वेमंत्र्यांकडून संभाजीनगर ते अहिल्यानगर व अहिल्यानगर ते पुणे अशी औद्योगिकरण, धार्मिक स्थळांचा विचार करून रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीलाही रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज या मार्गाचा डीपीआर देखील मंजूर झाल्याचे खा. नीलेश लंके म्हणाले.
भाजप-लंके समर्थकांमध्ये घोषणा युद्ध
अहिल्यानगर स्टेशनवर प्रथमच दाखल झालेल्या वंदे भारत एक्सप्रेच्या स्वागतासाठी सभापती राम शिंदे यांच्यासह खासदार नीलेश लंके उपस्थित होते. स्थानकात वंदे भारत रेल्वेचे आगमन होताच भाजप समर्थकांनी मोदी-मोदींच्या घोषणा दिल्या. त्या घोषणांना लंके समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर देत लंके लंके अशा घोषणा रेल्वे स्टेशन परिसण दणाणून सोडला. गाडी आल्यानंतर काही वेळ घोषणा युद्ध पहावयास मिळाले.