कर्जत । नगर सहयाद्री:-
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये वर्चस्व होते मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यामधून हद्दपार झाला असता परंतु रोहित पवार यांच्या विजयामुळे या पक्षाचे अस्तित्व नगर जिल्ह्यामध्ये राहिले आहे.कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या मध्ये अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीत रोहित पवार यांनी एक हजार 243 मतांनी विजय मिळवला आहे.यात रोहित पवार यांना 1लाख 27 हजार 676 तर आमदार राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी रात्री सव्वासात वाजता जाहीर केला.
मात्र या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्या नावाने जो डमी उमेदवार उभा केला होता आणि त्याला तुतारी सारखे दिसणारे चिन्ह दिले होते त्याला तब्बल 3744 मते मिळाले आहेत. या चिन्हामुळे आणि नाव साधर्म्य असल्यामुळे रोहित पवार यांना चांगलाच धोका निर्माण झाला. आणि राम शिंदे यांची जे दोन डमी उमेदवार होते त्यांना मात्र अतिशय नगण्य मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये रोहित पवार यांना मिळालेली 554 मतांची आघाडी अतिशय महत्त्वपूर्ण आणि निकालामध्ये निर्णयक ठरली.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ राज्यातील सर्वात लक्ष वेधले होते.कोण बाजी मारणार या बाबत शेवटच्या फेरी पर्यंत उत्सुकता होती .प्रत्येक फेरीत चित्र बदलत होते. सुरवातीला पहिल्या फेरीत रोहित पवार आघाडीवर होते.नंतर राम शिंदे यांनी मुसंडी मारत आघाडी घेतली. पुढील काही फेऱ्यात पुन्हा रोहित पवार यांनी आघाडी घेतली.नंतर पुन्हा राम शिंदे यांनी आघाडी घेतली.आणि शेवटच्या 26 व्यां फेरी मध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. शेवटच्या बॉल वर सिक्सर मारून मॅच जिंकली असा हा निकाल लागला आहे.