Maharashtra Crime News: नागपूर शहर हादरवून सोडणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीची शाळेतून घरी जात असताना निर्घृण हत्या करण्यात आली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत ही घटना गुरुवारी दुपारी घडली. दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर तिच्या शाळेजवळच एका अल्पवयीन मुलाने चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. आरोपी हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्येपूर्वी आरोपीने पीडितेला फोन केला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला वाटेत अडवून चाकूने हल्ला केला. ही घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे.
आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. अजनी पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेबाबत अजून अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित होता का, आरोपी कोणत्या मानसिक अवस्थेत होता, आणि शाळेतील सुरक्षा व्यवस्थेची काय स्थिती होती याचा तपास सुरू आहे.