अहिल्यानगर । नगर सहयाद्री
पुणे बसस्थानक, स्वास्तिक चौक येथे कारमधून प्रवास करणार्या महिलेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम लुटून तिला धक्का देत कारबाहेर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 23) दुपारी घडली. मात्र, कोतवाली पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या काही तासांतच संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 12 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नितीन गोसावी (रा. चिखली जि. बुलढाणा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराधा सोमेश्वर जगदाळे (वय 43 रा. लोनार गल्ली, सर्जेपुरा, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी अनुराधा या शिक्रापूरहून खासगी प्रवासी वाहनातून (कार) प्रवास करत होत्या. स्वस्तिक चौक, पुणे बसस्थानकासमोर त्यांना उतरायचे होते. मात्र, त्या एकट्या असल्याचा गैरफायदा घेत वाहन चालकाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण जबरदस्तीने खेचून घेतले,
तसेच पर्स, मोबाईल आणि रोख अडीच हजार रुपये घेऊन त्यांना वाहनातून बाहेर ढकलले आणि वाहन घेऊन पळ काढला. या प्रकारामुळे अनुराधा प्रचंड घाबरून गेल्या आणि त्वरित कोतवाली पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वाहनाचा क्रमांक (एमएच 28 बीडब्लू 9632) मिळवण्यात आला.
पोलिसांनी गोपनीय बातमीदारांना सतर्क करून वाहनाचा माग काढला. सदर वाहन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. अखेर पांढरी पुलाजवळ वाहनाचा पाठलाग करून संशयित आरोपी गोसावी याला ताब्यात घेतले. त्याच्या वाहनातच अनुराधा यांची पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम सापडली. त्याच्या ताब्यातून एक लाख 40 हजार रुपये किमतीचे दीड तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण, 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल, अडीच हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली 11 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 12 लाख 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.