अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर मधील बुऱ्हाणनगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, दोन सख्ख्या बहिणींचा अज्ञात आजाराने एकापाठोपाठ मृत्यू झाला आहे. अनुष्का नामदेव कर्डिले आणि ९ वर्षीय वेदिका नामदेव कर्डिले असे या दोन्ही बहिणींची नावं आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
२१ मार्च रोजी दोन्ही मुली अचानक आजारी पडल्या आणि त्यांना ताप, पोटदुखी आणि छातीत दुखणे अशी लक्षणे दिसू लागली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. अनुष्काला ताप आणि अस्वस्थता जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांनी औषधे देऊन तिला घरी पाठवले होते, तर वेदिकेवर दवाखान्यात उपचार सुरू होते.
मात्र, २१ मार्च रोजी अनुष्काच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि तिच्या हालचाली मंदावून ती मृत्यूमुखी पडली. तर दुसऱ्या दिवशी, २२ मार्चला वेदिकेचीही प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. दोन बहिणींच्या एकापाठोपाठ मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. वेदिकेचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले असून,त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.