अहिल्यानगर । नगर सहयाद्री
मोबाईल गेम खेळताना ओळख झालेल्या बिहारमधील तरुणाने शहरातील एका शिक्षणार्थी तरुणीवर दोन वेळा जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद अजमल वासीम (रा. सुखपुर, समस्तीपूर, बिहार) याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पीडित तरुणी ही शिक्षण घेत असून, काही महिन्यांपूर्वी मोबाईल गेम खेळताना तिची ओळख अजमल वासीमशी झाली. या ओळखीचे रुपांतर सुरुवातीला फोनवर संभाषणात, आणि नंतर प्रत्यक्ष भेटींमध्ये झाले. त्यानंतर आरोपीने तिला ३ ऑगस्ट २०२५ रोजी रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलच्या रूममध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या घटनेनंतर १६ ऑगस्ट रोजी, त्याने पुन्हा भेट घेवून तिचे फोटो काढले. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी, पुन्हा भेटीसाठी बोलावले. तरुणीने नकार दिल्यावर, तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी देऊन, पुन्हा हॉटेलमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अजमल वासीम याला अटक केली आहे.