राहुरी | नगर सह्याद्री:-
कोणताही जनसंपर्क नसताना फक्त तनपुरेंच्या घरात जन्म आणि मामाची फिल्डींग यातून राहुरीची उमेदवारी! विधानसभेच्या पायऱ्या पहिल्यांदाच पाहिल्या असतानाही लागलीच राज्यमंत्रीपद! तेही एक- दोन नव्हे सहा खात्याचे राज्यमंत्रीपद! या खात्याच्या अखत्यारीत वेगवेगळ्या सुनावण्या! त्यातून होणारी उलाढाल! मामाच्या मेहेरबाणीने सारेकाही अलबेल! अडीच वर्षाच्या या सत्ता कालावधीत राहुरी मतदारसंघातील जनतेचा पुरता भ्रमनिरास! संपर्कच होईना! पीए मंडळींच्या खुशमस्करीत आणि टिंगलटवाळीत मश्गुल प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघात पश्चातापाची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली. उच्च शिक्षीत असणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांच्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. कर्डिले यांच्या विरोधात लाट निर्माण करण्यात आणि त्यांच्या दहशतीच्या राजकारणाचा मुद्दा पेरत विरोधी मते मिळविण्यात तनपुरे यशस्वी झाले. यासाठी कर्डिले यांच्याकडून दुखावल्या गेलेल्यांची मोट प्राजक्त तनपुरे यांनी बांधली. विरोधकांना एकत्र केल्यानंतर राहुरीसह नगर तालुका आणि पाथड तालुक्यातील काही गावांमध्ये कर्डिले यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात याच मंडळींची मदत प्राजक्त तनपुरे यांना झाली. यातील अनेकांनी स्वत:ची पदरमोड करताना घरच्या भाकरी खाल्या! कर्डिले यांच्याबद्दल असणारा राग आणि द्वेषाच्या भावनेतून त्यावेळी अनेकांनी तनपुरे यांना मदत केली.
विधानसभेचा निकाल बाजूने लागताच प्राजक्त तनपुरे यांनी या साऱ्यांनाच बाजूला सारले. वाड्यावरच्या स्टाईलने त्यांनी राजकारण चालू केले आणि सामान्य जनतेला भेटणे देखील जिकीरीचे झाले. त्यातून जनतेशी असणारी नाळ देखील तुटली. अडीच वर्षे सहा खात्याचे राज्यमंत्री सांभाळताना त्या माध्यमातून काय- काय भानगडी केल्या आणि कोणत्या सुनावण्यांमधून काय काय निर्णय झाले याची गोळाबेरीज आता समोर येऊ लागली आहे. पीए सोबत बोला असं त्रोटक उत्तर द्यायला देखील तनपुरे यांना वेळ नव्हता. सत्ता गेल्यानंतर अलिकडच्या दोन वर्षात देखील प्राजक्त तनपुरे यांचा पाय जमिनीवर आला नाही. कोणतीही सत्ता नसताना शिवाजी कर्डिले यांनी पराभवाच्या पहिल्या दिवसापासून जनसंपर्क कायम ठेवला.
सुखदु:खात सहभागी होणारा आणि सामान्य जनतेच्या कुटुंबात जमिनीवर मांडी घालून समरस होणारा लोकप्रतिनिधी म्हणून कर्डिले यांनी त्यांची ओळख कायम ठेवली आणि तीच आता त्यांची जमेची बाजू ठरणार आहे. राहुरीकरांमध्ये निर्माण झालेली पश्चातापाची भावना आता संपूर्ण मतदारसंघातील गावांमध्ये दिसून येत आहे. मामाचा लाडका भाचा आमच्या काहीच कामाचा नाही अशा थेट प्रतिक्रिया सोशल मिडियातून सुरू झाल्या असून त्यावर तनपुरे कसे मात करतात हे येत्या काळात दिसेल.