पुणे / नगर सह्याद्री –
पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही तोच सत्ताधारी महायुतीच्या आमदाराचा आणखी एक नवीन प्रताप समोर आला आहे. अहिल्यानगर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख किरण काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहिल्यानगर विधानसभेच्या आ. संग्राम जगताप यांच्यावर नगर मधील जैन समाजाच्या असणार्या श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा मोयाच्या जागी असणार्या पाच हजार स्क्वेअर फूटच्या भूखंडावर बेकायदेशीर रित्यात ताबेमारी करत धर्म कार्यासाठीचा भूखंड हडपल्याचा, गंभीर आरोप काळे यांनी केला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी जॉइंट चॅरिटी कमिशनर, पुणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची काळे यांनी मागणी केली आहे.
त्यानंतर पुण्याच्या पत्रकार भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काळे माध्यमांशी बोलत होते. यावेळी काळेंनी सत्ताधारी महायुतीवर अनेक गंभीर आरोप केले. मृत्यपत्र, सिटी सर्व्हे उतारा, जागेचा नकाशा, भूखंड विक्री जाहीर नोटीस, आ. जगताप यांच्या राजकीय कार्यालय थाटत केलेल्या ताबेमारीचे फोटो, व्हिडिओ हे पुरावेच प्रसारमाध्यमांना दाखवत या प्रकरणाचा भांडाफोड केला.
काळे म्हणाले, या जागेचा पूर्वी जैन साधू, साध्वींच्या विश्राम, प्रवचनासाठी उपयोग केला जायचा. मात्र राष्ट्रवादीचे आ. जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची ही जागा हडप केली आहे. काही ट्रस्टींनी वैयक्तिक आर्थिक लाभातून संगनमत केले. जाहीर पेपर नोटीस काढून भूखंड विक्रीसाठी टेंडर प्रक्रिया राबविली गेली असल्याचे काळे म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस, पवारांचा आशीर्वाद आहे का?
काळे म्हणाले, देशात मोदींच्या तर देवाभाऊच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदूंच्या राज्यात हिंदूच खत्रे में आहेत. जैन ट्रस्टच्या भूखंडावरील आ. जगतापांच्या ताबेमारीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा आशीर्वाद, वरदहस्त आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. भूखंडावर असणारा बेकायदेशीर ताबा ८ दिवसांच्या आत खाली करण्याचे ताबाधारक आ. संग्राम जगताप आणि जैन मंदिर ट्रस्ट यांना तात्काळ आदेश करण्याची मागणी जॉइंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे केली आहे. ताबा खाली केल्यानंतर त्याबाबतचा छायाचित्र व व्हिडिओग्राफीसह अहवाल कमिशनर यांनी मागवावा असे त्यांनी म्हटले आहे.



