Maharashtra Crime News: मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण तापलं आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. मस्साजोगच्या घटनेची दहशत कायम असतानाच दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असतानाच आता पुन्हा एका सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुळजापूरमध्ये बीडच्या घटनेची पुनरावृत्ती घडल्याचे दिसून येत आहे.मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.26)रात्री करण्यात आला आहे.
सरपंच नामदेव निकम हे भावासह गाडीत बसले असताना त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी हल्लेखोरांनी सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीच्या काचाही दगडाने फोडल्या आहेत. यानंतर त्यांनी निकम यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला जो आहे तो, पवनचक्कीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.