पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्याच्या वाढत्या वीज मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सुपा येथे महावितरणच्या नवीन उपविभागाच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. ही माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली असून, त्यांच्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे ही मागणी सादर करण्यात आली होती.
आ. काशिनाथ दाते यांनी नुकतीच महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर ही माहिती त्यांनी दिली. यावेळी धोत्रे, ढोकी आणि वडनेर बुद्रुक या ठिकाणी नव्या सबस्टेशनसंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच त्यावरही निर्णय घेतला जाणार असल्याचेही आ. दाते यांनी सांगितले.
शेती, व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस कमालीची वाढत असून, सुपा व भाळवणी या ओउद्योगिक वसाहतींचा विस्तारही झपाट्याने होत आहे. परंतु पारनेर तालुका विस्ताराने मोठा, वाढत्या औद्योगिक वसाहतींना व शेती, व्यापारी व घरघुती ग्राहकांना मुबलक प्रमाणात वीजपुरवठा करण्याचे आव्हान केवळ एकाच कार्यालयामार्फत पेलवण्याची कसरत करताना महावितरणच्या अधिकाऱ्यांची होत असलेली दमछाक पाहून आमदार काशिनाथ दाते यांनी तालुक्याच्या विधानसभा सदस्यत्वाचा पदभार स्विकारल्यानंतर तालुक्यामध्ये एक नवीन उपविभाग मंजूर होण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला होता, दाते यांच्या पाठपुराव्यास आज यश अपेक्षित आले.
महायुती सरकाचे आभार
नवीन उपविभागीय कार्यालयामुळे तालुक्यामधील वीज ग्राहकांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या तक्रारी सोडविण्याकरिता मुबलक साहित्य उपलब्ध होणार आहे. या कार्यालयाच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह संपूर्ण महाराष्ट्र सरकाचे आभार.
– आ. काशिनाथ दाते सर