अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
नगरच्या इतिहासात गणपती विसर्जन मिरवणुकीत आत्तापर्यंत कधीच कव्वाली वाजविली गेली नाही. परंतु लोकसभेच्या निकालानंतर काही लोकांनी मतांसाठी लाचार होत विजर्सन मिरवणुकीत कव्वाली वाजवली. परंतु, विधानसभा निवडणुकीत कव्वाली वाजवणाऱ्यांचा कार्यक्रम झाला असल्याचा टोला आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांना लगावला. मतांतून जनतेनेच त्यांना जागा दाखवून दिल्याचेही ते म्हटले.
सारसनगर परिसरातील राधाकृष्ण मंदिरात महाआरती तसेच आमदारकीची हॅट्ट्रिक केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, उद्योजक सागर मुर्तडकर, यशवंत गारडे, हभप झुंबर आव्हाड, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे, भाऊसाहेब सिनारे, प्रवीण गुुंजाळ आदींसह मोठ्या संख्येने अन्य नागरिक उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून नगर शहरात राजकारण करीत आहे. परंतु, आतापर्यंत गणपती विर्सजन मिरवणुकीत कधीही कव्वाली वाजवली गेली नाही. इतिहासाची पाने उलटून पाहिली तर असे कधीही झालेले नाही. परंतु, 2024 मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत काहींनी कव्वाली वाजवल्याचे आमदार जगताप म्हणाले. लोकसभेनंतर काही लोक मतांसाठी लाचार झाले होते. त्यामुळेच गणपती विसर्जन मिरवणुकीत कव्वाली वाजल्या गेल्या. परंतु, त्या कव्वाल लोकांना विधानसभा निवडणुकीत मतदानातून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याचा हल्लाही त्यांनी चढवला.
जिहादी लोकांनी हिरवा गुलाल उधळला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार महाविकास आघाडीतून महायुतीत सामील झाले. राज्यात पुन्हा महायुतीचे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल उलटासुलटा लागला. त्यावेळी काही लोक समृद्धी महामार्गाने मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईकडे गेले. परंतु, त्यावेळी महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव होते ते पुसण्याचे काम जिहादी लोकांनी केले. लोकसभेनंतर हिरवा गुलाल उधळण्याचे काम केले. लोकसभेला लोक चुकले, त्याचे परिणाम सहा महिने जनतेला भोगावे लागले असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.