Crime News: कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील तुलसीगेरी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका मुलाने आपल्या सख्ख्या आईची गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवक्का गिरीसागर (वय अंदाजे ५५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर वेंकटेश गिरीसागर (वय २८) हा तिचा मुलगा आणि आरोपी आहे. काही वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर शवक्का आपल्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहत होती.
वेंकटेशला दारूचे व्यसन असून तो वारंवार आईकडे पैसे मागायचा. गुरुवारी रात्रीही त्याने आईकडे पैसे मागितले. मात्र, तिने नकार दिल्यामुळे वाद झाला. रागाच्या भरात वेंकटेशने आईचे हात-पाय बांधले, तोंडात कपड्याचा बोळा ठेवल्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.
शुक्रवारी सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतल्या भयावह दृश्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली.
कलादगी पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू करत त्यांनी गावात आणि परिसरात नाकाबंदी केली. काही तासांतच वेंकटेश एका बारमध्ये दारू पीत बसलेला आढळून आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, वेंकटेशवर हत्या आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.