पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नगरविकास विभागाच्या योजनेअंतर्गत पारनेर नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी तब्बल रु. ५ कोटींचा निधी शासनस्तरावरून मंजूर झाला असल्याची माहिती पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली आहे. आ. दाते सर यांनी पारनेर शहराच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत पाच कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या विकासकामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे.
या निधीतून पारनेर नगरपंचायत क्षेत्रातील विविध वार्डांमध्ये सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहेत. वार्ड क्र. २ मधील खंडेश्वर मंदिर परिसरात नगरपरिषदेचे सामाजिक सभागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, या कामासाठी रु. ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. वार्ड क्र. ६ मधील पुजारी वस्तीत गणपती मंदिर परिसरात तसेच वार्ड क्र. ८ मध्ये आणखी एक सभागृह उभारण्यासाठी एकत्रित रु. १६ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच वार्ड क्र. २ मधील कार्तिकस्वामी मंदिर परिसरात सामाजिक सभागृहासाठी रु. १५ लाख, तर कुलट वस्तीत खंडोबा मंदिर परिसरात सभागृह उभारणीसाठी रु. १६ लाखांचा निधी मिळाला आहे.
याचबरोबर पारनेर नगरपंचायत क्षेत्रातील बोळकोबा गल्लीतील गणपती मंदिर परिसरात नगरपरिषदेचे सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे. तसेच वार्ड क्र. ७ मधील वैदुवाडी येथील कानिफनाथ मंदिर परिसरातही सभागृह बांधण्याचे नियोजन असून, या दोन्ही कामांसाठी एकत्रित रु. १५ लाखांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.या पाचही सामाजिक सभागृहांच्या बांधकामांसाठी एकूण रु. १ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर रु. ३ कोटी २८ लाखांचा निधी इतर नागरी सुविधा उभारणीसाठी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांमुळे पारनेर शहरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आधुनिक व सुसज्ज सभागृहांची उपलब्धता होणार आहे. तसेच नागरी सुविधांवर भर दिल्याने शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि आदर्श सुविधा मिळण्यास मदत होईल.
सामाजिक उपक्रमांसाठी सक्षम सुविधा उपलब्ध होणार
पारनेर शहरातील नागरिकांना सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी योग्य जागेचा अभाव होता. नगरविकास विभागाच्या माध्यमातून या सभागृहांची मंजुरी मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि शहरात विविध उपक्रमांसाठी सक्षम सुविधा उपलब्ध होतील.
आ. काशिनाथ दाते, आमदार पारनेर विधानसभा मतदारसंघ
पारनेर नगरपंचायत क्षेत्रात विकासाची नवी पहाट
पारनेर नगरपंचायत क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी सुविधा अधिक बळकट करण्यासाठी विविध निधीचा वापर करण्यात येत आहे. आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रयत्नांनातुन नमो उद्यानासाठी १ कोटी तसेच नगरपंचायत कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मजूर झाला आहे. या विकास प्रकल्पांमुळे पारनेर नगरपंचायत क्षेत्रात विकासाची नवी पहाट उगवली जाणार आहे.
आ. काशिनाथ दाते, आमदार पारनेर विधानसभा मतदारसंघ



