अहमदनगर। नगर सहयाद्री
समोर आलेल्या वृत्तानुसार, नवी मुंबईतील एका महिलेची ठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून 28 लाख 14 हजार 79 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. स्नेहा राजेंद्र राजपाल (रा. उरण, नवी मुंबई) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
स्नेहा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (1 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट को. ऑफ क्रेडीट सोसायटीच्या (शाखा कापडबाजार, नगर) सर्व संचालक मंडळासह 16 जणांविरूध्द फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संचालक मंडळाची नावे खालीलप्रमाणे आहेत: हेमा सुपेकर, अशोक गंगाधर गायकवाड, राहुल अरूण दामले, मनिषा दत्तात्रय कुटे, राजेंद्र सुखलाल पराख, अजय चंद्रकांत आकडे, मधुकर मारूतराव मुळे, प्राजक्ता प्रकाश बोरूडे, धैर्यशील जाधव, नागनाथ भिकाजी शेटे, संजय चंद्रकांत खोंडे, चंद्रकांत सुरजमल आनेचा, प्रकाश बाबुलाल बचावत, मच्छिंद्र भिकाजी खाडे, शामराव हरी कुलकर्णी, सुनील रंगनाथ वाघमारे (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालक मंडळाची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, 21 मे 2015 ते 30 एप्रिल 2024 दरम्यान हा प्रकार घडला. स्नेहा राजपाल यांनी श्री. महालक्ष्मी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून 9 लाख 12 हजार 894 रुपये ठेवले होते. त्यावर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. रक्कम व त्यावरील व्याजासह 28 लाख 14 हजार 79 रुपयांची मागणी केली असता, संचालक मंडळाने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. स्नेहा यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहेत.