जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड बीड रस्त्यावर मोहा घाटाच्या शिवारात चालत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. याबाबत माहिती मिळाताच घटनास्थळी पोलीस आले त्यांनी तातडीने जामखेड नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाची गाडी बोलावून आग विझवली मात्र तोपर्यंत सर्व गाडी जळुन खाक झाली होती. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्याच्या मधोमध असलेले सदर वाहन बाजुला काढुन वाहतूक सुरळीत केली.
याबाबत पोलीसाकडुन मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि 7 डिसेंबर रोजी वहानचालक जयदीप संपतराव सुरवसे (रा. बीड) हे आपल्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एम. एच 46 एक्स 2268) बीड वरून जामखेड मार्गे रत्नागिरी या ठिकाणी चालले होते. यावेळी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारातून जात असताना समोरुन येणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकास सदर वाहनाच्या बोनेटच्या बाजुने जाळ निघत असल्याचे लक्षात आले. त्याने ही माहिती सदर वाहनचालक जयदीप सुरवसे यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर प्रसंगावधान राखून सुरवसे तातडीने गाडीतून खाली उतरले त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
रस्त्यालगत असलेल्या हॉटेलचालकाने तातडीने पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे यांना मोबाईलवरून माहीती दिली त्यांनी तातडीने जामखेड नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलास माहीती देऊन घटनास्थळी येण्यास सांगितले व ते पोलीस शिपाई देवा पळसे, ज्ञानेश्वर बेलेकर, पो. ना. सतिश सरोदे, प्रकाश मांडगे, घोळवे यांच्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस, ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या साह्याने वाहनाची आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु वा-याच्या वेगामुळे वाहनाने चांगलाच पेट घेतला होता. आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत वाहनाचा नुसता सांगाडा उभा राहिला होता. रस्त्याच्या मधोमध वाहन असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस कॉन्स्टेबल इंगळे यांना मोहा गावचे माजी सरपंच शिवाजी डोंगरे यांना फोन करून टॅक्ट्रर व रस्सी घेऊन बोलावून वाहतूक सुरळीत केली.