नाशिक । नगर सहयाद्री:-
निफाड तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या साठवलेल्या ७०० क्विंटल कांद्याच्या चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) पहाटे घडली असून, गोपाळराव संपत गाजरे या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
गोपाळराव गाजरे यांनी पाच लाख रुपये खर्च करून नऊ बिग्यांमध्ये (साडेचार एकर) उन्हाळ कांद्याचे पीक घेतले होते. चांगले उत्पादन मिळाले, मात्र बाजारभाव नाही मिळाल्याने कांदा विक्री न करता शेतातच चाळ बांधून साठवून ठेवला होता. त्यात जवळपास ७०० क्विंटल कांद्याचा साठा होता. मात्र, रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी चाळीला आग लावली. या आगीत संपूर्ण कांदा जळून खाक झाला.
या घटनेमुळे गोपाळराव गाजरे यांच्यासमोर १२ लाख रुपयांच्या सोसायटी कर्जाची परतफेड, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेला घासच निघून गेला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.
शेतकऱ्याने शासनाकडे तत्काळ आर्थिक मदत व कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनीही घटनेचा निषेध करून प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतमाल सुरक्षित आहे की नाही याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन आणि सरकारने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.